चित्पावनी बोलीचा प्रवास- मराठी लेख

               चित्पावनी बोली ही कोकणस्थ ब्राह्मणांची बोली आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत कोकणस्थ ब्राह्मणांचे मूळ सापडते. तिथून स्थलांतर होऊन आज गोवा व दक्षिण कन्नड भागापर्यंत चित्पावनी बोलणारे भाषीक गटागटाने सापडतात.  तशीच ही बोली कासारगोड पर्यंत बोलली जाते.
मुख्यत्वे गोव्यातील सत्तरी तालुक्यात जास्तशी कुटुंबे ही बोली बोलताना आढळतात. तसेच दक्षिण कन्नड जिल्ह्यात ही बोली बोलणारी कुटुंबे जास्त प्रमाणात आढळतात. व ती कासारगोड पर्यंत विखुरली गेली आहेत. महाराष्ट्राच्या रत्नागिरी  या जिल्ह्यात या बोलीचा जन्म झाला पण तिथे चित्पावनी बोली बोलली जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यात  कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबे असून चित्पावनी बोली नामशेष झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी, उदरनिर्वाहासाठी  ब्राह्मण कुटुंबांनी स्थलांतर केल्याचे अभ्यासाअंती दिसून येते. स्थलांतर करून चित्पावन समाज दक्षिण कन्नडा पर्यंत स्थायिक झालेला आढळतो. व तसाच जगभर पसरलेला आढळतो.
चित्पावन मंडळी म्हणजेच सध्या कोकणस्थ बाह्मण म्हणून ओळखले जातात. त्यांची परस्परांशी व्यवहार करण्याची बोली म्हणजेच चित्पावनी बोली, असे ढोबळ मनाने म्हणता येईल चित्पावनी असे नाव या बोलीला केव्हा प्राप्त झाले हा संशोधनाचा विषय आहे.
जुन्या मध्यम कालीन महाराष्ट्रीय भाषेचे विकसीत रूप म्हणून चित्पावनी बोली विकसित झाली असावी. ही बोली मुलत:प्राकृत भाषेतून निर्माण झाली असून आजपर्यंत आपले जुने रूप राखून आहे, असे एक मत आहे. डॉ. वासुदेव केतकर यांच्या मते यादवकालीन १८व्या शतकातील मराठी भाषेचे  दोन भाग म्हणजे  कोकणी व चित्पावनी. दोन्ही बोली एकच म्हणावे असे साम्य नाही. पश्चिम किनाऱ्यावर मराठीच्या अनेक बोली बोलल्या जातात, त्यापैकी चित्पावनी बोली ही एक आहे. 
चिपळूण हे चित्पावनांचे आद्य व मूळ स्थान मानले जाते. मात्र या तालुक्यातील लोकांना चित्पावनीचा गंधही नाही.
चित्पावनी बोली बोलणारी कुटुंबे जयगडच्या दक्षिणे पासून ते गोमंतका पर्यंत, तसेच पुढे ऊत्तर व दक्षिण कर्नाटका पर्यंत आढळतात. चित्पावनांच्या स्थलांतरामुळे या बोलीवर तेथील प्रादेशिक भाषेचा प्रभाव ठळकपणे जाणवतो.
  1. कोकणातील चित्पिवनीवर मराठी व मालवणीचा प्रभाव जाणवतो, पण कोकणात ही बोली लोप पावली आहे. अत्यंत वयस्क मंडळीनाच ती अवगत  आहे, किंवा ऐकलेली आहे. या बोलीसाठी देवनागरी लिपीचा ऊपयोग करतात.
  2. गोव्यातील चित्पिवनीवर  पोर्तुगीज व कोकणीचा प्रभाव जाणवतो. ईथेही देवनागरी लिपीचा ऊपयोग या बोलीसाठी करतात. गोव्यातील सत्तरी तालुक्यात ९०% कुटुंबे  चित्पावनी बोली बोलतात. उर्वरीत गोव्यात हे प्रमाण कमी आहे. सध्या तेथील तरुण पिढी  चित्पावनीचा उल्लेख करण्यास उदासीन दिसते.
  3. उत्तर कर्नाटकात चित्पावनी वर कानडी भाषेचा प्रभाव आहे. येथे या बोलीसाठी कन्नड लिपीचा उपयोग करतात.
  4. दक्षिण कर्नाटकात चित्पिवनीवर कानडी व तुळु भाषेचा प्रभाव आहे. तिथेही कन्नड लिपीचा उपयोग लिखाणासाठी करतात.
यावरून चित्पावनी बोलीची व्यापकता दिसून येते. कोकणातील चित्पावनी कालोत्घात लोप पावली आहे. तशी ती सर्वच प्रांतातून लोप पावू नये, टिकून रहावी म्हणून साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे.
चित्पावनी बोलीत साहित्य निर्मिती झाली नसली तरी संशोधनात्मक मराठी पुस्तके आहेत.
नारायण गोविंद चाफेकर – यांनी समाज शास्त्रीय व इतिहासीक अभ्यास करून  “चित्पावनी ”  या नावाचे पुस्तक शके १८६० मध्ये प्रकाशित केले.
तसेच इतिहासकार श्री राजावडे, इरावती कर्वे, लिंडा कोक्स (Linda Cox) ह्या लेखक संशोधकांनी चित्पावनीचा समाजशास्त्रीय अभ्यास केला पण पुस्तके प्रकाशित झाली नाहीत.
डॉ. वसुधा भिडे ह्यांनी “A Descriptive Study of Citpavni, a dialect of Marathi ”  ह्या विषयावर पुणे विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. त्या साठी त्याना १९८३ साली पुणे विद्यपीठाने पीएचडी प्रदान केली. त्यांच्या डॉक्टरेट थिसिसवर आधारित “चित्पावन आणि चित्पावनी” हे पुस्तक त्यांनी २०१३ साली प्रकाशित केले.
श्री. के . जी. साठे ह्यानी “चित्पावनी” या नावाने १९३८ साली भाषा शास्त्रीय विश्लेषण करणारे पुस्तक प्रकाशित केले.
गोव्यातील लेखक,  खास करून सत्तरीचे सुपुत्र,  पं. महादेवशास्त्री जोशी यांनी आपल्या पुस्तकातून चित्पावनी संवाद अधोरेखित केले.
ह.मो. मराठे यांनी आपल्या “बालकांड” या पुस्तकात चित्पावनी संवादांचा समावेश केला आहे.
श्री. श्रीधर केशव बर्वे यांनी “सुलभ चित्पावनी”  चित्पावनी भाषा मार्गदर्शक, या नावाने ची पुस्तिका प्रकाशित केली आहे. निबरातली सावळी हे चित्पावनी नाटक लिहून नाट्यप्रयोग सादर केला आहे.
ह्यांच्या पावलावर पाउल ठेवत, साहित्यात भर घालण्याचा मी एक लहानसा प्रयत्न केला आहे.
१. ” खडतर जिणां ” हे एक पुर्ण चित्पावनी बोलीतून ललित लेखांचे एक  पुस्तक २०१७ साली प्रकाशित केले आहे.
२. ” काळजातले कुकारे ‘  हे एक पुर्ण चित्पावनी पुस्तक नोव्हेंबर २०२० मध्ये प्रकाशित केले आहे.
३.  “अभ्यास चित्पावनी बोलीचा ” हे  चित्पावनी मार्गदर्शक पुस्तक ऑक्टोबर २०२१ ला प्रकाशित झालं आहे.
४.  ” ना घर ना दार ”  हे चित्पावनी नाटक लिहून नाट्यप्रयोग सादर केला आहे.
५. “आमचे आमी” हे पूर्ण चित्पावनी व्यक्ती चित्र संग्रह डिसेंबर २०२२ ला  प्रकाशन झालं  आहे. 
चित्पावनी बोलीचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार : 
  • ” चित्पावनी ऑनलाइन ” वर्ग,
  • चित्पावनी बोलीभाषा ” फेसबुक ग्रुप,
  • चित्पावनी बोली ” फेसबुक Page,
  • ” चित्पावनी बोली ” व्हाट्सप गृप
  • चित्पावनी बोली ” YouTube चॅनेल
  • ” चित्पावनी बोली ” ललित, कथा, व्यक्तिचित्रण, शब्दकोष, चित्पावनी मार्गदर्शक, मासिक साप्ताहिक व दिवाळी अंकासाठी  लेखन चालू आहे. 
अस माझं कार्य चालू असून जर कुणालाही जॉईन व्हायचं असेल तर कॉमेंट मध्ये लिहा .
धन्यवाद
अशोक नेने ‘स्वच्छंदि’
 वाळपोई , ता. सत्तरी, गोवा

Leave a comment